
अमरावती, 18 एप्रिल, (हिं.स.) अमरावतीतील बडनेरा परिसरातील कोडेश्वर रोड येथे सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बोधिभूमी सांस्कृतिक संकुल तसेच ५१ फूट उंच भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीच्या कामाची पाहणी आ.रवि राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत केली. या पाहणी दौऱ्यात प्रकल्पांची प्रगती समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद करत कामाचा वेग कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या.
दीर्घ पाठपुराव्यानंतर साकार होत असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे बडनेरा व अमरावतीच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे राणा यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, तसेच वैद्यकीय शिक्षणासाठीही नवे पर्याय निर्माण होतील.
याशिवाय सुमारे १०० कोटी रुपयांच्या बोधिभूमी सांस्कृतिक संकुलामुळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना व्यासपीठ मिळणार आहे. या ठिकाणी उभारली जाणारी ५१ फूट उंच भगवान गौतम बुद्धांची मूर्ती परिसराचे प्रमुख आकर्षण ठरणार असून, धार्मिक व पर्यटनदृष्ट्या या भागाचे महत्त्व वाढणार आहे.
पाहणीदरम्यान आ.रवि राणा यांनी अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता अबाधित ठेवत नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “हे प्रकल्प केवळ पायाभूत सुविधा वाढवणार नाहीत, तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीही निर्माण करतील. परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हा यामागील मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या दौऱ्यात युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनिल राणा, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, नायब तहसीलदार टिना चव्हाण तसेच मंडळ अधिकारी श्री. धोटे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रकल्पांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती देत काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. तसेच अजय घुले, जगदीश अंबाडकर, सुनिल निचत, मुकेश उसरे, शुभम उंबरकर आदींचीही उपस्थिती होती. एकूणच या पाहणीमुळे प्रकल्पांना अधिक गती मिळणार असून, बडनेरा परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी