
जिल्हाध्यक्षपदासाठी दोन, शहराध्यक्षपदासाठी एक अर्जअमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) : संघटन सृजन अभियानांतर्गत अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नेतृत्व बदलासाठी इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून 17 एप्रिल हा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिवस होता. अंतिम दिवशी जिल्हाध्यक्ष पदासाठी दोन तर शहराध्यक्ष पदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, सुरुवातीचे दोन दिवस एकही अर्ज न आल्याने चर्चांना उधाण आले होते, मात्र शेवटच्या दिवशी दोघांनी अर्ज भरत स्पर्धा निर्माण केली. दरम्यान, या पदासाठी इच्छुक असलेले सुधाकर भारसाकळे यांनी अखेरपर्यंत अर्ज दाखल न केल्याचे समोर आले.
शहराध्यक्ष पदासाठी गुरुवारी सात ते आठ अर्ज दाखल झाले होते, तर अंतिम दिवशी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार यांनीही आपला अर्ज सादर केला.
संघटन सृजन अभियानामुळे काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी गेल्या तीन दिवसांपासून शहरात आढावा घेणारे निरीक्षक वरिष्ठ पातळीवर कोणता अहवाल सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रकाश साबळे यांनी एआयसीसी निरीक्षक अहमद यांच्याकडे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करत पक्ष संघटनेबाबत सविस्तर चर्चा केली. “काँग्रेसला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजणाऱ्यांपासून पक्ष वाचवावा,” अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच, “आम्ही पक्षविरोधात नाही, मात्र हेकेखोर प्रवृत्तीविरोधात आमची भूमिका कायम राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील स्थानिक घडामोडींवरही साबळे यांनी आपली भूमिका मांडली आहे.-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी