
मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.)। : महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था आलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे.
पृथ्वी दिन २०२६ निमित्ताने करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत विकासाची चौकट मजबूत करण्यासाठी तसेच नागरिक, संस्था आणि उद्योगांना हरित भविष्यासाठी एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या भागीदारीत MITRA संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ दिले जाणार असून, अर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणी, जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.
या सहकार्यांतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार
● मिशन लाइफ (Mission LiFE): नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्यव्यापी आराखडा
●सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज: ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी उत्तरदायित्व निश्चित करणे
●आर्टिस्ट फॉर द अर्थ: हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग
● मुंबईला ‘सस्टेनेबल इव्हेंट्स कॅपिटल’ बनवणे: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक स्तरावर शाश्वत कार्यक्रमांचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न
फ्लॅगशिप उपक्रम : ५६ लाख वृक्षारोपण
● या करारातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ५६ लाख वृक्षारोपण मोहीम. पृथ्वी दिनाला ५६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राज्यभरात ५६ लाख झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘ग्रीनिंग महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ३०० कोटी वृक्षारोपण मोहिमेचा एक भाग आहे.
ही मोहिमेत केवळ वृक्षलागवडीवरच नव्हे, तर झाडांचे जगण्याचे प्रमाण (Survival Rate), देखरेख आणि दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम यावर विशेष भर दिला जाणार आहे.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाच्या दिशेने एक ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल मानले जात आहे.
हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक स्तरावर पाऊल टाकले असून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला देशातील 'क्लायमेट ॲक्शन लीडर' बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर