
छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल (हिं.स.)।
जिल्हा महोत्सव समितीच्यावतीने महात्मा बसवेश्वर जयंती यंदाही अपूर्व उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. रविवारी (ता. १९) सकाळी साडेआठला दुचाकी वाहन रॅली जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मृती उद्यानापासून टीव्ही सेंटर चौक, बजरंग चौक, आविष्कार कॉलनी, महात्मा बसवेश्वर चौकापर्यंत निघणार आहे. सायंकाळी संगमेश्वर मठ, गुलमंडी, मछली खडक, भांडी मार्केट, संस्थान गणपती ते टीव्ही सेंटर चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी नऊला रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी सायंकाळी पाच ते सातदरम्यान सेल्फ डिफेन्स आणि तायक्वांदो कार्यशाळा होणार आहे. चिकलठाणा गोशाळेत चारा वाटप आणि एन-२ येथील अनाथ आश्रमात मुलांना भोजन देण्यात येणार आहे.
महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी २१ ते २३ एप्रिलदरम्यान आरी वर्क फॅशन डिझायनिंग क्लासचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ३० प्रकारचे वर्क शिकवले जाणार असून, इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेस ज्ञानेश्वर खैरे, नगरसेवक सचिन खैरे, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, भारत लकडे, सचिन संगशेट्टी, शिवा खांडखुळे यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis