
परभणी, 18 एप्रिल (हिं.स.)।
पेडगाव येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा मिरवणूक, डीजे आदी पारंपरिक उपक्रमांना फाटा देत समाजोपयोगी आणि शैक्षणिक उपक्रमांद्वारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्रशाला, पेडगाव येथे इयत्ता पाचवी ते नववीतील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी शालेय साहित्याचे बक्षिस वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना रजिस्टर, टिफिन बॅग, पाणी बाटली, कंपास, पेन, पेन्सिल, रायटिंग पॅड आदी साहित्य देऊन त्यांचे मनोबल उंचावण्यात आले. याचबरोबर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २५ युवकांनी सहभाग घेत रक्तदान केले, ही विशेष बाब ठरली.या कार्यक्रमास ज्ञानेश्वर गायकवाड (जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद परभणी), गोविंद गायकवाड (अध्यक्ष), संतोष राठोड (उपाध्यक्ष), अमोल गायकवाड, अविनाश गायकवाड, गोविंद असोरे, करण कांबळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती लक्ष्मी कोटरवार होत्या. सूत्रसंचालन शेळके सर यांनी केले. यावेळी सय्यद अमीन, गोंगे व ज्ञानेश्वर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान मित्र मंडळाच्या वतीने चारही शाळांना सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील राजेंद्र कळंके, श्रीमती मस्के, जोंधळे, कारले, बाकले, भोकरे, आचार्य, सय्यद, बोबडे आदींनी विशेष सहकार्य केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis