
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदचा वाढदिवस काही पोलिस कर्मचाऱ्यांनी साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे तपास प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता बाधित होऊ नये यासाठी परतवाडा पोलिस ठाण्यातील एक अधिकारी आणि दोन अंमलदारांना पुढील चौकशीच्या अधीन राहून निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहेत.
या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे तपासावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून एकूण सहा अधिकारी व अंमलदारांना कंट्रोल रूमला संलग्न करण्यात आले होते. यामध्ये एपीआय सलीम शेख, हेड कॉन्स्टेबल अब्दुल नाझीम अब्दुल कलीम, शुभम दिलीप शर्मा, मयूर सदानंद गुरव, मोहन धनराज वावरे आणि पुरुषोत्तम मधुकर बावनेर यांचा समावेश होता.
यापैकी एपीआय सलीम शेख, पोलिस अंमलदार शुभम शर्मा आणि मयूर गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आरोपी अयान अहमदने पीडितांच्या शोषणासाठी कठोरा रोडवरील भाड्याच्या फ्लॅटचा वापर केल्याचे समोर आले आहे. या फ्लॅटची झडती घेऊन पंचनामा करण्यात आला असून, फ्लॅट मालकाचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात सुमारे 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
तपासात असेही उघड झाले आहे की आरोपी पीडितांना अमरावतीतील कठोरा रोडवरील कॅफे रॉयल, अचलपूरमधील कॅफे फ्रेंड्स टाऊन, परतवाड्यातील (सध्या बंद) कॅफे सोशल जंक्शन तसेच वझ्झर डॅम परिसरातील गार्डन येथे भेटत असे. या सर्व ठिकाणांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणारे 41 अकाउंट्स सायबर सेलच्या मदतीने डिलीट करण्यात आले आहेत.
पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी यासाठी महिला पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्यामार्फत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पीडित किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी 9773975635 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे. पीडितांची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा राष्ट्रीय महिला आयोगानेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी