
पालकमंत्र्यांची जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.)।
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील पहिली पीडिता समोर आली असून ती नागपूर येथील असल्याची माहिती आहे. संबंधित युवती सध्या पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवत आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पालकमंत्री बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर असून त्यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद , पोलीस आयुक्त राकेश ओला, विशेष तपास पथक प्रमुख शुभम कुमार , स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे तसेच आमदार प्रवीण तायडे उपस्थित होते.
बैठकीत विशेष तपास पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी ७ मोबाईल, एक हार्ड डिस्क व एक टॅब जप्त करून ते न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत. तपास अनेक स्तरांवर सुरू असून पुढील काळात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
बावनकुळे यांनी सांगितले की, हा प्रकार अत्यंत गंभीर असून शासन यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांनी नागरिक व लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, कुठलेही भडकाऊ, जातीय किंवा धार्मिक वक्तव्य करू नये आणि पोलिसांना निष्पक्ष तपास करू द्यावातसेच त्यांनी पीडितांना आवाहन केले की, कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊन पोलिसांना जबाब द्यावा. या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक नेत्यांनी जबाबदारीने वागणे गरजेचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही राजकीय नेत्यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. डॉ.अनिल बोंडे,नवणीत राणा, आणि प्यारे खान यांनी माध्यमांमध्ये वक्तव्ये करण्याऐवजी त्यांच्याकडे काही ठोस माहिती किंवा पुरावे असतील तर ते थेट पोलिसांकडे द्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. “माध्यमांमध्ये बोलण्यामुळे तपास भरकटू शकतो, त्यामुळे जबाबदारीने वागणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी