दर्जेदार बांधकामाबरोबरच वृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष द्या - शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणारी विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच वृक्षलागवड करण्यावर भर द्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. सुभेदारी शासकीय विश्रामगृ
दर्जेदार बांधकामाबरोबरच वृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष द्या - शिवेंद्रराजे भोसले


छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणारी विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच वृक्षलागवड करण्यावर भर द्या, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता श्री. सुंदरदास भगत यांच्यासह प्रादेशिक विभागातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत कामांच्या देखभाल-दुरुस्ती मध्ये कंत्राटदार टाळाटाळ करत असतील, तर निविदेतील अटींनुसार त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. यात वृक्ष लागवड हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. लावलेली झाडे जगली नसतील, तर संबंधित कंत्राटदाराची देयके अदा करू नये असे आदेश मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.

कामाचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (साइटवर) क्षेत्रभेटी देऊन देखरेख करावी. राज्य शासनाने प्रलंबित देयकांचा आकडा कमी केला असून, इथून पुढे कामांसाठी नियमित निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

सार्वजनिक विभागामार्फत पूर्ण झालेल्या काही महत्त्वाच्या वास्तूंच्या कामांबाबत मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये प्रामुख्याने वेरूळ घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विटा-चुन्यातील कमान, पोकळी व घुमट रचना , विधि विद्यापीठातील मुलांच्या मेसची इमारत, छत्रपती संभाजीनगर शहरातील २०० खाटांचे महिला रुग्णालय. बीड येथील २०० खाटांचे रुग्णालय आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण विभाग याचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे मुख्यालय असून येथे व्हीव्हीआयपी (VVIP) व्यक्तींचा वावर , मंत्री याचे दौरे, कार्यक्रम,याची संख्या जास्त असते. हे लक्षात घेऊन नवीन इमारतींचे बांधकाम आणि जुन्या विश्रामगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande