
‘बॉटल्स फॉर चेंज’ अंतर्गत नव्या सुविधांचे उद्घाटन
पुणे, 18 एप्रिल (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असून ते नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यास प्रभावी ठरत आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बसण्याच्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे उद्घाटन आज महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिका कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमात ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक सुविधांचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा आहे.
या प्रसंगी बोलताना महापौर लांडगे म्हणाले की, नागरिकांनी पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमास उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सीएसआर सेलमधील वरिष्ठ अधिकारी तसेच बिसलेरी इंटरनॅशनलचे सस्टेनेबिलिटी व कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु