गोकुळ दूध संघाची पाच वर्षांत ऐतिहासिक प्रगती; दूध उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा
कोल्हापूर, 18 एप्रिल (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांनी मागील पाच वर्षांत उल्लेखनीय प्रगती करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार दिला असल्याची माहिती चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ताराबाई पार्
गोकुळ दुध संघाच्या प्रगतीचा आढावा सादर करताना चेअरमन आणि सर्व संचालक


कोल्हापूर, 18 एप्रिल (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांनी मागील पाच वर्षांत उल्लेखनीय प्रगती करत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार दिला असल्याची माहिती चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या गेल्या पाच वर्षांतील सर्वांगीण प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. नेतृत्वाचे मार्गदर्शन, दूध उत्पादक शेतकरी, संस्था, कर्मचारी, वाहतूकदार आणि प्रसार माध्यमांच्या सहकार्यामुळे अनेक दूरदृष्टीपूर्ण निर्णय प्रभावीपणे राबवले गेल्याचे त्यांनी सांगितले.

दूध दरात मोठी वाढ

गेल्या पाच वर्षांत गोकुळने दूध खरेदी दरात ऐतिहासिक वाढ केली आहे. म्हैस दुधाचा दर 39 रुपयांवरून 53.50 रुपये प्रतिलिटर झाला असून गायीच्या दुधाचा दर 26 रुपयांवरून 36 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही दरवाढ संघाच्या इतिहासातील उच्चांकी मानली जात असून लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

उलाढाल आणि संकलनात झेप

संघाची वार्षिक उलाढाल 2020-21 मधील 2551 कोटींवरून 2025-26 मध्ये 4100 कोटींवर पोहोचली आहे. दूध संकलनही 12.22 लाख लिटर प्रतिदिनवरून 16.20 लाख लिटरपर्यंत वाढले असून अलीकडे 20 लाख लिटरचा टप्पाही गाठण्यात आला आहे.

नवीन उत्पादने आणि बाजार विस्तार

गोकुळने बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क, मसाला ताक, टेट्रा पॅक लस्सी, चीज, गुलाबजाम आणि आईस्क्रीम यांसारखी नवीन उत्पादने बाजारात आणत पुणे व मुंबईसह विविध ठिकाणी विक्री वाढवली आहे.

शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना

शेतकऱ्यांसाठी जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वासरू संगोपन, पशुखाद्य योजना, बियाणे अनुदान तसेच आधुनिक उपकरण योजना राबवण्यात आल्या आहेत. महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान’ विमा योजनेअंतर्गत 2 लाखांचे संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ऊर्जा बचत आणि प्रकल्प यश

सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक दुग्धशाळा विस्तार आणि रेफ्रिजरेशन अपग्रेडेशनमुळे दरवर्षी कोट्यवधींची बचत होत आहे. पेट्रोल पंप प्रकल्पातूनही नफा मिळवत संघाने आर्थिक बळकटी साधली आहे.या पत्रकार परिषदेस संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande