
परभणी, 18 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील गायत्रीनगर येथे झालेल्या चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या आदित्य मिलिंद प्रधान यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेहासह सेलू पोलीस ठाण्यात शनिवारी ठिय्या आंदोलन केले. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून आरोपींनी आनंद दगडू ढोले व आदित्य प्रधान यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या आदित्य प्रधान यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आनंद ढोले यांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संघमित्रा दगडू ढोले यांच्या फिर्यादीवरून बुध्दभूषण पिराजी ढगे, अशोक पांडुरंग पाईकराव, रवि पांडुरंग पाईकराव, कुणाल बाळू सोनटक्के, अजय भानुदास उघडे, कविता अशोक पाईकराव व सीमा बुध्दभूषण ढगे (सर्व रा. गायत्रीनगर, सेलू) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी अद्याप फरार आहेत. घटनेच्या तपशीलानुसार, आरोपी बुध्दभूषण ढगे याने आनंद ढोले याला जेवणासाठी बोलावून पैशांची मागणी केली होती. पैसे नसल्याने आनंद घरी परतल्यावर आरोपींनी त्याच्या घरी जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आदित्य प्रधान यांच्यावरही अशोक पाईकराव याने चाकूने वार केला. इतर आरोपींनीही मारहाण करून दोघांना गंभीर जखमी केले. दरम्यान, खूनातील मुख्य आरोपी अशोक पाईकराव अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत करीत आहेत. नातेवाईकांच्या ठिय्या आंदोलनामुळे पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असून पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis