
मुंबई, 18 एप्रिल (हिं.स.) - जोगेश्वरी, अंधेरी आणि गोरेगाव (पूर्व) परिसरातील वाढती लोकसंख्या आणि आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, या भागात तातडीने मदत मिळावी यासाठी जोगेश्वरी येथील 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर' रुग्णालयाजवळ महापालिकेच्या जागेवर 'मिनी फायर स्टेशन' उभारण्याची मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे पत्र लिहून जनहितार्थ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
जोगेश्वरी, अंधेरी आणि गोरेगाव पूर्व या परिसरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती, व्यावसायिक संकुले आणि झोपडपट्ट्यांची घनता वाढली आहे. त्यमुळे लोकसभा क्षेत्रातील लोकसंख्येत हि मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याची मुख्य अग्निशमन केंद्रे लांब अंतरावर आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे आणीबाणीच्या प्रसंगी अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी वेळेत पोहोचणे कठीण होते, ज्यामुळे आगीच्या घटनांमध्ये मोठे नुकसान सोसावे लागते.
ट्रामा केअर रुग्णालयाजवळ महानगरपालिकेची मोकळी जागा (न.भू.क्र.४९) उपलब्ध आहे. या ठिकाणी मिनी फायर स्टेशन झाल्यास, जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी पूर्व व पश्चिम, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अपघातांच्या वेळीही तत्काळ बचावकार्य करणे शक्य होईल. यामुळे दुर्घटनेवेळी व्यक्तीचे प्राण वाच्व्न्याबरोबरच आगीच्या घटनांवेळी कमीत कमी अर्थीक नुकसान होण्यापासून टाळण्यास मदत होणार आहे. येथील स्थानिक जनतेकडूनही याची सातत्याने मागणी माझ्याकडे करण्यात येंत आहे.
त्यामुळे जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे मिनी फायर स्टेशन अत्यंत गरजेचे असून, यामुळे भविष्यातील मोठी जीवित व वित्तहानी टाळता येईल. प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून जनहितार्थ या ठिकाणी मिनी फायर स्टेशन उभारण्यासाठी निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, असे खासदार वायकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी