
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण व अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील “द कॅफे रॉयल 10” येथे काही तरुणींना आणून त्यांच्यासोबत अश्लील कृत्ये करत शोषण केल्याचा आरोप आहे. तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, संबंधित कॅफे पूर्वीपासून वादग्रस्त असल्याचेही समोर येत आहे. यापूर्वी पोलिसांनी येथे धाड टाकून मुला-मुलींना ताब्यात घेतल्याची नोंद आहे. तसेच, या परिसरातील काही कॅफेंमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. आरोपीने केवळ एका ठिकाणीच नव्हे, तर कठोरा नाक्यावरील फ्लॅट, अमरावती शहरातील इतर कॅफे, परतवाडा, अचलपूर तसेच वझ्झर धरण परिसरातील एका कॅफेमध्येही तरुणींवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून या सर्व ठिकाणांची पडताळणी सुरू असून, संबंधित कॅफे आणि ठिकाणांबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीविरोधात कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी