
रायगड, 19 एप्रिल (हिं.स.)। : मागील दहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधाचा अत्यंत दु:खद शेवट झाल्याची घटना अलिबागमध्ये उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अक्षय युवराज निकाळे (वय ३०, मूळ रा. Nashik), सध्या रामनाथ, अलिबाग येथे वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचे अलिबागमधील एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते आणि भविष्यात एकत्र आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहत होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी लग्नाचा विषय निघाल्यानंतर संबंधित तरुणीने अचानक नकार दिला. या निर्णयामुळे अक्षयला मोठा मानसिक धक्का बसला. ज्या नात्यावर त्याने आयुष्याची स्वप्ने उभी केली होती, ते नाते तुटल्याने तो प्रचंड नैराश्यात गेला होता. नकारानंतर तो सतत तणावाखाली राहू लागला होता, अशी माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तींनी दिली.
या मानसिक अवस्थेतून बाहेर पडणे त्याला शक्य झाले नाही. अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे प्रेमप्रकरणातून उद्भवणाऱ्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)