
लातूर, 19 एप्रिल, (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता होऊन त्यापैकी एकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
चाकूर येथील जुने महादेव मंदिर गल्लीत राहणारे साइचरण दिनेश स्वामी (वय १० वर्षे) आणि देवंश मंगेश स्वामी (वय ७ वर्षे) हे दोन्ही मुले १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली होती. दुपारी १ वाजेपर्यंत मुले घरी न परतल्याने ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भांडे, पीएसआय निळकंठे, बीट अंमलदार गोविंद बोळंगे, चंद्रशेखर डीगोळे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून व्यापक शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, दुपारी २:१० वाजेच्या सुमारास शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली असतानाच चाकूर-उजळंब रोडवरील नरेंद्र शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत सात वर्षीय देवंश स्वामी याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून फॉरेन्सिक टीम व श्वान पथकाच्या मदतीने पुराव्यांचे संकलन केले जात आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलिसांची एकूण चार विशेष पथके तयार करण्यात आली असून ती विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक स्वतंत्र पथक देखील कार्यरत आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पोलीस प्रशासन या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे आणि संशयास्पद माहिती आढळल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis