
नाशिक, 19 एप्रिल (हिं.स.)। महिलांचे लैंगिक शोषण करुन फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्याने केलेल्या महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने ताबा घेतल्यानंतर अशोक खरातला रविवार, दि. १९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर भोंदूबाबा अशोक खरात याला गुरुवार, दि. २३ एप्रिलपर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिल शैलेंद्र बागडे यांनी आरोपी खरात याला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी आपल्या युक्तीवादात आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला मात्र वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे औषध पाजून आणि त्यांची फसवणूक करून खरात याने अत्याचार केले आहेत. या द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
तर आरोपी अशोक खरातचे वकिल सचिन भाटे यांनी कोठडीला विरोध केला. त्यांनी पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाल्याने पुन्हा कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. मात्र, पीडितांची संख्या आणि गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात अशोक खरात याला पोलीस कोठडी सुनावली.
खरातचे दुखणे थांबेना
सुनावणी दरम्यान अशोक खरातच्या वकिलांनी न्यायलयात खरात याच्या तब्येतीचा मुद्दा मांडत एक मागणी केली. खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले असून त्याचे डोकेही दुखत आहे. हे दुखणे थांबावे यासाठी त्याने पेनकिलर आणि इतर औषधे घेऊनही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे खरातला नेण्यात यावे. तसेच त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती खरातचे वकील सचिन भाटे यांनी केली. त्यावर पोलिसांनी आवश्यक ते औषधोपचार आणि न्यूरोसर्जनकडे तपासणीसाठी नेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या.
खरातची पत्नी अजूनही फरार
अशोक खरात याने महिलांच्या लैंगिक शोषण आणि भोंदूगिरीतून कोट्यवधींची माया जमवली आहे. त्याची ही बेनामी मालमत्तेची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. तसेच त्याची पत्नी कल्पना खरात ही शिर्डी येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच फरार झाली. तिचा शोध पोलीस घेत आहेत.
-------------------़
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV