
रायगड, 18 एप्रिल (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील भाकरीवाले पाटील महिला स्वयंसहाय्यता समूहाने ग्रामीण महिलांच्या जिद्दी, एकजुटी आणि कष्टाच्या जोरावर यशाची नवी कहाणी घडवली आहे. घरगुती स्तरावर सुरू झालेला हा छोटा व्यवसाय आज यशस्वी हॉटेल उद्योगात रूपांतरित झाला असून, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
19 ऑक्टोबर 2018 रोजी स्थापन झालेल्या या समूहाचे नेतृत्व सौ. वैभवी चंद्रकांत राऊळ यांनी केले. सुरुवातीला अलिबाग परिसरातील वाढत्या पर्यटनाचा विचार करून हॉटेलांना भाकरी पुरवण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला. महिलांच्या पारंपरिक कौशल्याला संघटित रूप देत त्यांनी व्यवसायाची मजबूत पायाभरणी केली.
अलिबाग, नागाव, काशीद आणि मुरुड या पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने भाकरी पुरवठ्याला चांगली मागणी निर्माण झाली. याच संधीचा फायदा घेत महिलांनी व्यवसायाचा विस्तार केला. पुढे त्यांनी होमस्टे सुरू करून ग्राहकांना अस्सल घरगुती चवीचा अनुभव दिला, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या यशाच्या जोरावर जानेवारी 2023 मध्ये अलिबाग येथे “भाकरीवाले पाटील लंच होम”ची पहिली शाखा सुरू झाली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2023 रोजी दुसरी शाखा सुरू करण्यात आली. दोन्ही ठिकाणी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
उमेद अभियानामुळे समूहाला अधिक बळ मिळाले. आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि बँकिंग सुविधांमुळे व्यवसायात वाढ झाली. सुरुवातीला घेतलेले ३ लाखांचे कर्ज वेळेत फेडून त्यांनी विश्वासार्हता सिद्ध केली व पुढे अधिक निधी मिळवला.
समूहाला “महालक्ष्मी सरस 2023-24” मध्ये उत्कृष्ट विक्रीसाठी गौरविण्यात आले असून “सावित्री रत्न पुरस्कार 2024” नेही सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांच्या यशामुळे राज्यभरातून शाखा सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत आहेत.
भाकरीवाले पाटील समूहाची ही वाटचाल ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जिद्द आणि एकजुटीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)