
सोलापूर, 18 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने दिलासा दिला असला, तरी मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय राजाराम डोंगरे (वय 35, रा. आढेगाव, ता. मोहोळ) हे नव्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असताना पावसामुळे घराकडे निघाले होते. याचदरम्यान अचानक विजेचा कडकडाट होऊन वीज त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आढेगाव परिसरात शोककळा पसरली असून, गावकऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरासह उत्तर सोलापूर, बार्शी व मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाची नोंद झाली. दिवसभर 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
अचानक झालेल्या हवामान बदलामुळे दिलासा मिळाला असला, तरी विजेच्या घटनांमुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड