
पुणे, 19 एप्रिल (हिं.स.)। महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. १५ पैकी १३ समित्यांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार असून, दोन प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. १३ पैकी १२ समित्यांचे अध्यक्षपद भाजपला मिळणार असून, एका समितीवर काँग्रेसचा अध्यक्ष असणार आहे.
प्रभाग समित्यांच्या रचनेत हस्तक्षेप करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीला ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले आहे. ढोले पाटील रोड आणि येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेत पक्षीय बलाबलानुसार १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसला एक प्रभाग समिती मिळणार होती. यामध्ये महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला एकही प्रभाग समिती मिळणार नव्हती.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु