
लातूर, 19 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याच्याकडील सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी घरी जात असताना अजय दिलीप काळे व त्याचे साथीदार मोटारसायकलवर येऊन त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सुमारे 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेत घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
या कारवाईत
1. अजय दिलीप काळे
2. देवेंद्र शिवराम सलगर (दोघे रा. कातपूर रोड, लातूर)
यांना ताब्यात घेऊन 16 एप्रिल 2026 रोजी अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (अंदाजे किंमत 75 हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (अंदाजे किंमत 60 हजार रुपये) असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis