
अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)।
खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असतानाच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी येत्या २७ एप्रिलपासून बेमूदत बंदचा इशारा दिला आहे. शासनाने या विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न केल्याने राज्यस्तरीय बंदचे आवाहन महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाइड, सीडस् डीलर्स असोसिएशनने (माफदा) केले असून त्यास अमरावती जिल्हा कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेने समर्थन देत सहभाग जाहीर केला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी दिली. कंपन्यांकडून खतांचे लिंकिंग कृषिनिविष्ठा विक्रेत्यांवर करण्यात येत असून कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होणारे कंपनीस्तरावरील लिंकिंग बंद करणे, एचटीबीटी बियाण्यांची तस्करी रोखणे, साथी पोर्टल अॅप वापराची सक्ती विक्रेत्यावर न करता बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपनी स्तरावर राबविणे, बियाण्यांचे नमूने फेल गेल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता साक्षीदार करणे, गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या नमुन्यांची रक्कम वर्षानुवर्षे विक्रेत्यांना मिळालेली नाही, ती परत करणे या मुख्य मागण्यांसह एकूण १४ प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.माफदाने यासंदर्भात कृषी संचालक व कृषी आयुक्तांना निवेदन सादर केले. स्थानिक पातळीवर संघटनेकडून जिल्हाधिकारी व विभागीय कृषी सहसंचालकांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे मिलिंद इंगोले यांनी सांगितले. वारंवार यासंदर्भातील निवेदने देण्यात आली असली तरी शासन व कृषी विभागाकडून ठोस निर्णय होत नसल्याने कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कृषी विभागाने या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आठ दिवसांत त्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली असून २७ एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी