
रायगड, 19 एप्रिल (हिं.स.)। डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुट्ट्या पैशांची टंचाई निर्माण झाली असून, यामुळे ग्राहकांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन व्यवहार करताना सुट्टे पैसे सहज उपलब्ध होत नसल्याने बाजारपेठेत गैरसोय वाढत आहे.
जिल्ह्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात खरेदीदरम्यान ग्राहकांकडून प्रामुख्याने ५०० रुपयांच्या नोटा दिल्या जातात. मात्र दुकानदारांकडे सुट्टे पैसे नसल्याने व्यवहारात अडथळे निर्माण होत आहेत. अनेक वेळा ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. काही वेळा तर सुट्टे पैसे नसल्यामुळे ग्राहकांना घेतलेली वस्तू परत ठेवावी लागते.
एसटी बस, रिक्षा, मिनिडोअर तसेच इतर प्रवासी वाहतूक सेवांमध्येही ही समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. चालक आणि प्रवासी दोघांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. डिजिटल पेमेंटचे पर्याय जसे की गुगल पे, फोन पे, कार्ड पेमेंट व इतर माध्यम उपलब्ध असले व तरी ग्रामीण भागात किंवा लहान व्यवहारांमध्ये त्याचा वापर सर्वत्र शक्य होत नाही.
प्रवास करताना बहुतांश वेळा ५००/200 रुपयांच्या नोटाच मिळत असल्याने लहान व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. पानपट्टी, चहाचे स्टॉल, वडापाव विक्रेते यांसारख्या छोट्या व्यावसायिकांना दोन-तीन रुपयांच्या नफ्यावर व्यवसाय करावा लागतो. अशा परिस्थितीत सुट्ट्या पैशांची कमतरता त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने लक्ष घालून भारतीय रिझर्व बँक मार्फत बाजारात सुट्ट्या नोटा आणि नाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी जिल्ह्यातील व्यावसायिक, ग्राहकांकडून व जनतेकडून जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)