रायगड - शुभ मुहूर्त साधत नागरिकांची खरेदी; सोने-नवीन वस्तूंना प्राधान्य
रायगड, 19 एप्रिल (हिं.स.)।अक्षय्य तृतीयेच्या च्या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात नवीन वस्तू आणि सोने खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात असल्य
गोल्ड


रायगड, 19 एप्रिल (हिं.स.)।अक्षय्य तृतीयेच्या च्या शुभ मुहूर्तावर जिल्ह्यात नवीन वस्तू आणि सोने खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात असल्याने बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सराफ दुकाने सकाळपासूनच ग्राहकांनी फुलून गेली होती. महिलांनी सोन्याचे दागिने, नाणी तसेच बिस्किटे खरेदी करण्यास प्राधान्य दिले. सोन्याचे दर वाढलेले असतानाही ‘अक्षय्य तृतीया’ निमित्त सोने खरेदी करण्याची परंपरा कायम असल्याने खरेदीत कोणतीही घट दिसून आली नाही.

याचबरोबर नवीन वस्तू खरेदीलाही नागरिकांनी पसंती दिली. घरगुती साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. अनेकांनी या शुभ दिवशी नवीन वाहनांची खरेदी करून डिलिव्हरी घेतली. काहींनी प्लॉट खरेदी, गृहप्रवेश तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही हा दिवस निवडला.

हिंदू धर्मात या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा होणाऱ्या या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. यावर्षी १९ एप्रिल रोजी हा सण साजरा करण्यात आला.

एकूणच, महागाईच्या पार्श्वभूमीवरही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रायगड जिल्ह्यात सोने व नवीन वस्तू खरेदीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande