
लातूर, 19 एप्रिल (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अहमदपूर आगार प्रमुख अमर पाटील यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे अद्याप स्मार्ट कार्ड उपलब्ध झालेले नाही, अशा प्रवाशांनाही सवलतीचा प्रवास पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही, अशा पसरत असलेल्या चुकीच्या अफवांवर प्रवाशांनी कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू नये, असे आवाहन आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य परिवहन महामंडळामार्फत ६५ वर्षे व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच महिलांसाठी सवलतीच्या दरात प्रवासाची मोठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः महिलांसाठी सुरू असलेल्या अर्ध्या तिकीट दरातील (५०% सवलत) योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक महिला या सुविधेचा लाभ घेत आहेत. सध्या आगारात स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असली, तरी तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर कारणांमुळे अद्याप अनेक प्रवाशांना हे कार्ड मिळालेले नाही. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की कार्डशिवाय सवलत बंद होणार का? मात्र, आगारप्रमुख अमर पाटील यांनी हा संभ्रम दूर केला आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, महामंडळाची सवलत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून केवळ स्मार्ट कार्ड नाही म्हणून कोणाचीही हक्काची सवलत नाकारली जाणार नाही. ज्यांच्याकडे कार्ड नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्याकडील ओळखपत्राच्या आधारे नियमानुसार सवलत दिली जात आहे आणि ती भविष्यातही सुरू राहील. सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी केवळ खबरदारी म्हणून लवकरात लवकर आपले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून पुढील प्रवास अधिक सुलभ होईल. महामंडळाच्या या स्पष्टीकरणामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis