
पुणे, 19 एप्रिल (हिं.स.)। भारताच्या आरोग्यसेवेचा प्रवास आता निर्णायक पणे'सुविधांच्या अभावाकडून' 'उद्देश्यपूर्ण काळजीकडे वळला पाहिजे,जिथे तंत्रज्ञान हे सहानुभूतीची जागा न घेता तिला अधिक बळकट करेल,असे मत एमक्युर फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी 'सिमहेल्थ २०२६'च्या समारोप समारंभात व्यक्त केले.
“कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्यसेवा व्यावसायिकांना पुनरावृत्तीच्या कामांमधून मुक्त करून रुग्णांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत करू शकते. त्याचबरोबर,पर्यायी उपचारपद्धतींचा समावेश आणि महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सर्वसमावेशक आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यावश्यक आहे,”असे त्यांनी सांगत देशभरातील प्रतिनिधींना परिवर्तनाचे दूत बनण्याचे आवाहन केले.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखा (FoMHS)यांच्या वतीने नुकतेच ‘SYMHEALTH 2026’या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट आरोग्यसेवेचा स्वीकार: भाकीत-आधारित,अचूक आणि वैयक्तिकृत आरोग्य प्रणाली (“Embracing Smart Healthcare: Predictive, Precision and Personalized Health Systems”)या संकल्पनेवर आधारित ही परिषद सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये संपन्न झाली.
आरोग्यसेवा,तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरण यावरआयोजित केली जाणारीSYMHEALTHपरिषदचे हे यंदाचे २७ वे वर्ष होते. या परिषदेने देशातील अग्रगण्य शैक्षणिक परिषदांपैकी एक म्हणून विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या परिषदेत १,४०० हून अधिक प्रतिनिधीनी आपला सहभाग नोंदवला ज्यामध्ये चिकित्सक,संशोधक,सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ,आयटी नवोन्मेषक तसेच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
आरोग्यसेवेच्या भविष्यावर भाष्य करताना थापर यांनी भारताच्या'थ्री ए' (Access -उपलब्धता, Awareness -जागरूकता आणिAffordability -परवडणारी किंमत) कडे लक्ष देण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्याचबरोबर,कृत्रिम बुद्धिमत्ता,पर्यायी उपचार पद्धती आणि महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणाऱ्या भविष्यवेधी दृष्टिकोनाचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की,एआय (AI)निदान,क्लिनिकल चाचण्या आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते,ज्यामुळे आरोग्यसेवा तज्ज्ञांना सहानुभूती आणि वैयक्तिकृत काळजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल. त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत आयुर्वेद,पोषण आणि निसर्गोपचार पद्धतींच्या एकात्मिकरणाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. तसेच,महिलांच्या आरोग्यासाठी अधिक जागरूकता,संशोधन आणि गुंतवणुकीचे आवाहन केले,कारण हे आरोग्य क्षेत्रातील अजूनही दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु