अमरावती कारागृहात पुन्हा ‘गांजा बॉल’ची एन्ट्री; बाहेरून फेकल्याचा संशय, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.) जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा संशयास्पद प्रकार उघडकीस आला असून कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारागृह परिसरात गांजा भरून तयार केलेला ‘बॉल’ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा बॉल बाहेर
कारागृहात पुन्हा ‘गांजा बॉल’ची एन्ट्री; बाहेरून फेकल्याचा संशय, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा संशयास्पद प्रकार उघडकीस आला असून कारागृहाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारागृह परिसरात गांजा भरून तयार केलेला ‘बॉल’ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा बॉल बाहेरून कारागृहात फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव हे नियमित गस्त घालत असताना त्यांना संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी बॅरेक क्रमांक १४ आणि १५ दरम्यान असलेल्या स्वच्छतागृहाच्या टिन छतावर गोलाकार वस्तू आढळून आली. ती वस्तू संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले.घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत त्या वस्तूची तपासणी करण्यात आली असता काळ्या टेपने गुंडाळलेले पाकीट उघडण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६४.७० ग्रॅम वजनाचा हिरवट ओला गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत सुमारे ३,२०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच वापरण्यात आलेले कागद, प्लास्टिक आणि चिकटपट्टीचे साहित्यही जप्त करण्यात आले.विशेष म्हणजे, २०२१ पासून कारागृहात अशाप्रकारे बाहेरून गांजा किंवा आक्षेपार्ह वस्तू फेकण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी रबरच्या चेंडूमध्ये गांजा भरून तो आत फेकण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र यावेळी दगडाच्या साहाय्याने बॉल तयार करून तो आत टाकण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.या ‘गांजा बॉल’ची रचना पाहता प्रथम दगडाभोवती गांजा भरून त्यावर प्लास्टिकचे दोन थर देण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण वस्तू काळ्या टेपने घट्ट गुंडाळून शेवटी कागदाने बांधण्यात आली होती, ज्यामुळे तो सहज फेकता येईल आणि संशय न येता आत पोहोचेल, अशी युक्ती वापरण्यात आल्याचे दिसते.दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande