
रायगड, 19 एप्रिल (हिं.स.)। : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने अलिबाग नगरपरिषदेने महत्त्वाचा पुढाकार घेत समुद्रकिनारी ‘बॉटल बीन’ उपक्रम सुरू केला आहे. वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने याकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक बाटल्यांचा वाढता कचरा लक्षात घेता, त्याच्या संकलनासाठी विशेष बॉटल बीन बसवण्यात आली आहे. या उपक्रमासाठी गो-ग्रीन नर्सरी प्रा.ली. या संस्थेमार्फत बॉटल बीन नगरपरिषदेला भेट देण्यात आली. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे तसेच अनिल चोपडा यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता धोक्यात येत आहे. यावर उपाय म्हणून बॉटल बीनसारख्या उपक्रमांची गरज अधोरेखित होत आहे. नागरिकांनी वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या या बीनमध्ये टाकल्यास कचरा व्यवस्थापन सुलभ होऊन परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे.
‘गो ग्रीन’ संस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला असून, भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिक ठिकाणी राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून अलिबागचा समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)