महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे दुर्दैवी - नवनीत राणा
अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.) देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले. त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रच
महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे दुर्देवी, नवनीत राणांचा भावनिक उद्रेक, अश्रू अनावर…


अमरावती, 19 एप्रिल (हिं.स.)

देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले. त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.

विधेयक फेटाळल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा या अतिशय भावूक झाल्या. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. विरोधकांनी हे विधेयक जाणीवपूर्वक रोखले, असा आरोप त्यांनी केला. हा दिवस काळा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. महिलांना न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण आम्ही त्यांना पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही, यासाठी आम्ही त्यांची माफी मागतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच विरोधकांना महिलांकडून कधीच माफी मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेत महिलांचे प्रमाण १४ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा होती. महिलांना देशाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय आणि समान सहभाग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण विरोधकांनी विरोध करून ही संधी हिरावून घेतली आणि महिलांवर अन्याय केला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी या विधेयकाला विरोध केला. देशातील महिला त्यांना कधीच माफ करणार नाहीत. काही नेत्यांच्या कुटुंबातील महिलांना मोठी पदे सहजरीत्या मिळू शकतात, पण सामान्य महिलांना संधी नाकारले जाते. पक्षाासाठी, देशासाठी काम करणाऱ्या सामान्य कुटुंबातील महिलांना संधी देणारे हे विधेयक नामंजूर झाले, यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष जबाबदार आहे, असाही आरोप नवनीत राणा यांनी केला.

नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधेयक आणल्याबद्दल आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत आणून त्यावर चर्चा घडवून आणली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. एक पंतप्रधान म्हणून त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. देशातील महिलांनी त्यासाठी त्यांना धन्यवाद द्यायला हवेत, असेही नवनीत राणा म्हणाल्या. स्वातंत्र्यानंतर प्रथमच महिलांच्या आरक्षणाबाबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. मात्र, ही संधी विरोधकांनी वाया घालवली, असे त्या म्हणाल्या

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande