
त्र्यंबकेश्वर, 19 एप्रिल (हिं.स.)
- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची फसवणूक केलेल्या प्रकरणांमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलक आणि त्याचे दोन्ही पुतण्यांच्या बँक खात्यामध्ये संसद व्यवहार झाल्याचे समोर आले असून याबाबत अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे
जागतिक ख्यातीचे देवस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, त्यांचे पुतणे ओम व अभिषेक कडलग आणि गोटीराम पेहरे यांना न्यायालयाने २० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या गंभीर मुद्यामध्ये ओम व अभिषेक या संशयितांच्या बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद आढळले आहेत.
अभिषेक कडलग याच्या बँक खात्यात नोव्हेंबर २०२५ पासून तब्बल ५ लाख ८६ हजार ३१८ रुपये, तर ओम कडलगच्या खात्यात ७ लाख ७० हजार ५८९ रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. ही रक्कम नेमकी कोठून आली? भाविकांकडून घेतलेल्या रोख रकमेचे हे ‘लॉड्रिंग’ आहे का? यावर संशयितांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नाही. भाविकांकडून घेतलेली रोख रकम थेट स्वतःच्या खात्यात न भरता, ती हाताखाली काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यात भरली जायची आणि तिथून ती संशयितांच्या खात्यात वळवली जात होती, असा युक्तिवाद अभियोग कक्षाच्या सहायक संचालक डॉ. किरण बेंडभर व सहायक सरकारी अभियोक्ता कांचन सोनवणे यांनी केला.
‘प्रतीक मिंदे’ या कामगाराच्या खात्यातून १ लाख ७२ हजार १०० रुपये ओम कडलगच्या खात्यात आल्याचे पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. तसेच ‘हॉटेल सत्कार’ मधून अभिषेकच्या खात्यात जमा झालेले १ लाख ३० हजार रुपये जमा झाल्याची नोंद आढळली आहे. त्यामुळे दर्शनाच्या नावाखालीच नाही, तर भाविकांच्या राहण्या-खाण्याच्या व्यवस्थेमधूनही कमिशनचे जाळे विणले गेल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे. फसवणूक करताना बनावट नावाने नोंद करणे, ही मंदिर प्रशासनातील सुरक्षा यंत्रणेवर असलेल्या दबावाचीच प्रचिती देते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV