
मुंबई, 19 एप्रिल, (हिं.स.)। युवासेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि युवासेनेला नवी दिशा देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आज युवासेनेचे वार्षिक संमेलन “महायुवौत्सव २०२६” राज्यभरातून आलेल्या हजारो तरुणांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वरळी डोम येथे संपन्न झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले, आज महायुवौत्सवमध्ये राज्यातील गावागावातून युवा सैनिक सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युवासेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
युवासेना ही एक विचारसरणी आहे. युवासेना अन्यायाविरुद्ध , मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारी संघटना आहे. आपण लोकांचा विश्वास प्रमाण मानून काम करतो. क्रांती घडवण्याची ताकद ही तरुणांमध्ये असते. युवासेना मराठी माणसाच्या हक्कासाठी, न्यायासाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी ताकद आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतुकोद्गार शिंदे यांनी काढले.
युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे युवासैनिकांशी संवाद साधला. आज अभिमान वाटतो की, गेल्या चार वर्षांत शिवसेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. शिवसेनेची ताकद आज महाराष्ट्रात वाढली असून, युवासेना हीच पुढची शिवसेना आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही अनेक युवकांना युवासेनेने सक्षम नेतृत्व दिले आहे. याचा प्रत्यय युवासेना सचिवांकडे पाहून येतो. आजच्या युवासेनेचा आम्हाला मला प्रचंड अभिमान आहे, असे कौतुक श्रीकांत शिंदे यांनी केले.
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी युवासैनिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून आज या ठिकाणी युवा सैनिक आला आहे. आज हे हजारो तरुण शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवटले आहेत.
आपण आम्हा युवा सैनिकांवर दाखवलेला विश्वासामुळे आम्हाला ताकद मिळाली त्यामुळे यापुढेही असेच आम्ही काम करत राहू, असा विश्वास पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. या महाराष्ट्रात जर कुठली युवा संघटना असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी युवासेना आहे. ही नेत्यांची संघटना नाहीतर कार्यकर्त्यांची संघटना आहे, असे ही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात महायुवौत्सवामध्ये उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते युवासेनेच्या अधिकृत वेबसाइटचे अनावरण करण्यात आले, तसेच सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आणि युवासेनेचे नवीन प्रेरणादायी गीत प्रदर्शित करण्यात आले. तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात कार्य करण्यासाठी युवा स्क्वॉड या नव्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करून शिंदे साहेबांना युवा सैनिकांच्यावतीने अनोखी भेट देण्यात आली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले आयपीएस होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारे श्री. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (आयपीएस), साध्या सोप्या भाषेतून इंग्रजी भाषेची गोडी लावणारे श्री. शिवानंद कुंभार, 'रेड सॉइल स्टोरीज' या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या कोकणातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबर्स श्रीमती. पूजा गवस, जिल्हा परिषदेच्या शाळांना सामाजिक सहकार्यातून आर्थिक आधार देणारे श्री. सिद्धेश लोकरे, बीच प्लीज इंडिया संस्थेचे पर्यावरणवादी मल्हार कळंबे, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती पुढे घेऊन जाणारे शौर्य वाडा हॉटेलचे मालक, हॉटेल व्यावसायिक विकास हांडे आदी मराठी तरुणांना मान्यवरांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरा, खासदार धैर्यशील माने, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, शिवसेना उपनेत्या शायना एन सी, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार रवींद्र धंगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या महायुवौत्सवातून युवाशक्तीच्या माध्यमातून नवा आणि प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर