चांदूर रेल्वे नगर परिषदेत मार्चमध्ये 2.25 कोटी कर जमा
अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.) मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती (दंड) माफी योजनेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेने मार्च महिन्यात विक्रमी कर वसुली करत इतिहास घडवला आहे. अवघ्या महिनाभरात २.२५ कोटी रुपयांच्या जवळ
चांदूर रेल्वे नगर परिषदेत मार्चमध्येच वसुली जोमात;2.25 कोटी कर जमा


अमरावती, 02 एप्रिल (हिं.स.)

मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती (दंड) माफी योजनेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेने मार्च महिन्यात विक्रमी कर वसुली करत इतिहास घडवला आहे. अवघ्या महिनाभरात २.२५ कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता कर जमा झाल्याने नगर परिषद प्रशासनात समाधानाचे वातावरण आहे. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी केलेल्या आवाहनाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात थकीत कर भरला. ‘अभय योजना’मुळे दंडात मिळालेल्या सवलतीचा लाभ घेत नागरिकांनी पुढाकार घेतल्याने कर वसुलीला मोठी गती मिळाली.

या ऐतिहासिक वसुलीत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेले विशेष परिश्रम मोलाचे ठरले. मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर प्रशासन विभागाने घराघरात संपर्क साधत कर भरण्याबाबत जनजागृती केली. परिणामी कर संकलनात अभूतपूर्व वाढ झाली. चांदूर शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाल्याबद्दल नगराध्यक्षांनी शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले. “शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी सांगितले. तर या यशात विशेष योगदान दिल्याबद्दल नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच कर प्रशासन विभागातील कर्मचारी कर निरीक्षक शारदा कावळे, कनिष्ठ लिपिक विशाल सुरकार व कॉम्प्युटर ऑपरेटर सागर हटवार यांचा शाल देऊन सन्मान केला. सत्कारानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “याआधी कोणत्याही नगरपालिकेत आमच्या कामाचा असा सन्मान झाला नव्हता. आमच्या कार्याची पावती म्हणून सर्व कर्मचाऱ्यांसमोर आमचा गौरव करणाऱ्या या पहिल्या नगराध्यक्षा आहेत. अभय योजनेचा लाभ, नगराध्यक्षांचे नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेत झालेली ही विक्रमी कर वसुली शहराच्या विकासासाठी मोठे पाऊल मानले जात आहे.

शहरवासीयांचे आभार

निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेल्या मालमत्ता कर माफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आम्हाला यश आले , याचा मनापासून आनंद व समाधान वाटते. चांदूर रेल्वे शहरातील नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात कर भरून नगरपरिषदेला मोलाचे सहकार्य केले, याबद्दल मी सर्व शहरवासीयांची मनःपूर्वक आभारी आहे. नागरिकांच्या या सकारात्मक सहभागामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. -

प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा, नगराध्यक्ष, चांदूर रेल्वे

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande