
परभणी, 02 एप्रिल (हिं.स.)।
कोरडवाहू शेतीसाठी एआय व हवामान-सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.डॉ. इंद्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कोरडवाहू शेती संशोधन व अनुप्रयोग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका या विषयावर मानव संसाधन विकास प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 31 मार्च 2026 रोजी उत्साहात पार पडला. हा उपक्रम अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी संशोधन व शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेतीसाठी हवामान-सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचे सांगितले. कोरडवाहू शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने उत्पादनक्षमता वाढविता येते, असे त्यांनी नमूद केले. वेळेचे योग्य नियोजन, यंत्रीकरण आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर हे घटक शेती यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान-तटस्थ तंत्रज्ञान विकसित करून ते शेवटच्या शेतकर्यापर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मर्यादित संसाधनांमध्ये अचूक व्यवस्थापन आणि पूर्वतयारीचे महत्त्वही त्यांनी सांगितले. डॉ. भगवान आसेवार यांनी कृषि क्षेत्रातील मानव संसाधन विकासाचे महत्त्व स्पष्ट करत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रगतशील शेतकर्यांना नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. राकेश आहिरे यांनी हवामान-आधारित शेती तंत्रज्ञानाच्या मूल्यमापन व सुधारणा यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकात प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. तांत्रिक सत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. कैलास डाखोरे यांनी विद्यमान हवामान स्थिती व अंदाज याविषयी माहिती दिली. डॉ. गोपाळ शिंदे यांनी कृषि संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका स्पष्ट केली, तर डॉ. प्रविण कापसे यांनी अध्यापन व संशोधनात एआय साधनांचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले. डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी आर्थिक नियोजन व जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांवर माहिती दिली. या प्रसंगी कोरडवाहू शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार करणार्या शेतकरी बंधू-भगिनींचा कुलगुरू यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. हिराकांत काळपांडे, विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात शेतकर्यांचे अनुभव कथन व गटचर्चा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विविध शेतकर्यांचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis