
अकोला, 02 एप्रिल (हिं.स.)। महिला सक्षमीकरण, सामाजिक जागरूकता आणि संघटन बळकटीकरण या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ रोजी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शहरातील प्रमिलाताई ओक हॉल, गांधी रोड येथे सकाळी ११ वाजता होणार असून, जिल्हाभरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप हे कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र निरीक्षक गजानन भटकर तसेच अकोला जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संज्योती मांगे व शहराध्यक्ष श्रीमती छायाताई इंगळे यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता पांडुरंग वाडेकर असतील. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ. सीमाताई राजगुरु (प्रदेश महासचिव), सौ. राधाताई कुरील (नगरसेविका, अमरावती), सौ. लिनाताई चिम (प्रदेश उपाध्यक्ष) तसेच सौ. अर्चनाताई मसने (माजी महापौर) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक अॅड. सागर श्रीकांत चौथे हे महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात महिलांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. झटपट प्रश्नोत्तरे, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक सादरीकरणे यांचा समावेश असून, महिलांना आपली कला व कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. तसेच नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडणार असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान सकाळी ११ ते १२.३० या वेळेत उपस्थित राहणाऱ्या महिलांना प्रवेशद्वारावर कूपन देण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर त्या कूपनच्या आधारे आकर्षक भेटवस्तू प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या भव्य महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास, एकजूट आणि सामाजिक भान वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे