अकोल्यातील 'मातृभक्त तपे हनुमान मंदिर' भाविकांसाठी विशेष आकर्षण
अंजनी मातेसह स्वयंभू हनुमानाचे एकमेव स्थान ; ४७५ वर्षांची परंपरा अकोला, 02 एप्रिल (हिं.स.) : हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त अकोल्यातील मोहता मिल चाळ परिसरात वसलेले ''मातृभक्त तपे हनुमान मंदिर'' भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरते. सुमारे
Photo


अंजनी मातेसह स्वयंभू हनुमानाचे एकमेव स्थान ; ४७५ वर्षांची परंपरा

अकोला, 02 एप्रिल (हिं.स.) : हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त अकोल्यातील मोहता मिल चाळ परिसरात वसलेले 'मातृभक्त तपे हनुमान मंदिर' भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरते. सुमारे पावणेपाचशे वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर विदर्भातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे अंजनी माता आणि हनुमान एकत्र विराजमान आहेत.

मंदिराच्या स्थापनेशी अकोलसिंह या राजपूत सरदाराशी संबंधित आख्यायिका जोडली जाते. विदर्भातील धार्मिक इतिहास आणि पारंपरिक महत्त्वामुळे हे मंदिर विशेष ओळखले जाते. मंदिरात प्रवेश करताच तटबंदी, आकर्षक प्रवेशद्वार, सूर्यप्रतिमा आणि 'ॐ' चिन्ह भक्तांचे स्वागत करतात.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने सकाळी ६ वाजता हनुमान जन्मोत्सव, दुपारी १२ वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. विशेष म्हणजे, सुक्या मेव्याचे लाडू हा प्रसाद भक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी मंदिराला भेट देतात.

भाविकांच्या श्रद्धेनुसार, हनुमानाच्या मूर्तीच्या उजवीकडे असलेली अखंड ज्योत सुमारे पावणेपाचशे वर्षांपासून अखंड प्रज्वलित आहे. ही ज्योत भक्तांसाठी श्रद्धा, ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानली जाते. तसेच, अंजनीमातेची उपस्थिती असल्याने महिला भाविकांना येथे विशेष धार्मिक सोयी उपलब्ध आहेत, ज्यामुळे हे मंदिर 'मातृभक्तीचे प्रतीक' म्हणूनही ओळखले जाते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande