
अकोला, 02 एप्रिल (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी नालीतून गॅस काढण्याचा प्रतीकात्मक उपक्रम राबवला.अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातही जाणवत असून, गॅस टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे.शहरी भागात नागरिकांना तब्बल २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी गॅस सिलेंडर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
गॅस मिळवण्यासाठी विविध एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम सोडून तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच एजन्सीसमोर उभ्या असलेल्या नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.यावेळी सरकारच्या निषेधार्थ नालीतून गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरल्याचा प्रतीकात्मक प्रयत्न करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे