
बीड, 02 एप्रिल, (हिं.स.) - अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये १०३२ कोटी रुपयांचा एकूण बँकिंग व्यवसाय पूर्ण करून सहकार क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने ६६५ कोटींच्या ठेवी जमा केल्या असून ५ कोटी २६ लक्ष रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. अत्यंत शिस्तबद्ध आर्थिक नियोजनामुळे बँकेने 'शून्य टक्के' नेट एनपीए राखण्यात अभूतपूर्व यश मिळवल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्रभरातील २३ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक कार्यामुळे हे शिखर गाठणे शक्य झाले आहे. सध्या बँकेचे भागभांडवल २१ कोटी असून स्वनिधी ५४ कोटींवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत व्यवसायात १३० कोटींची मोठी वाढ झाली असून स्थापनेपासून बँकेने आपला 'अ' ऑडिट वर्ग कायम राखला आहे. पारदर्शक व्यवहार आणि भक्कम वसुलीमुळे बँकेने आपली विश्वासार्हता सिद्ध केली असल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis