
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)।
नाशिक-कल्याण दरम्यान प्रस्तावित लोकल (इमू) रेल्वे सेवेबाबत केंद्र सरकारने पुन्हा एकदा टोलवाटोलवीची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करत रेल्वे मंत्रालयाला जाब विचारला; मात्र मंत्रालयाचे उत्तर तांत्रिक कारणांपुरते मर्यादित राहिल्याने नाशिककरांमध्ये निराशा पसरली आहे.
नाशिकरोड ते कल्याण या मार्गावर लोकल सेवा सुरू करणे ही अत्यावश्यक गरज असल्याचे वाजे यांनी अधोरेखित केले. गेल्या दोन वर्षांत हा मुद्दा अनेकदा मांडूनही ठोस निर्णय न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रेल्वे मंत्रालयाने उत्तरात कसारा-कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर आधीच ३६ उपनगरी गाड्या सुरू असल्याचे नमूद केले. तसेच नवीन इमू सेवा सुरू करणे हे मार्ग क्षमता, पाथ उपलब्धता, रोलिंग स्टॉक व पायाभूत सुविधांवर अवलंबून असल्याचे सांगितले. कसारा-इगतपुरी घाटातील बोगद्यांची मर्यादित रुंदी ही प्रमुख अडचण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, या अडचणींवर उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर किंवा सेवा सुरू करण्याची ठोस वेळमर्यादा याबाबत मंत्रालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे नाशिक-मुंबई कनेक्टिव्हिटीचा हा महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे. खासदार वाजेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही केंद्राकडून ठोस निर्णय न झाल्याने आता प्रत्यक्ष कृतीचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV