लातूरात प्रतिबंधित गुटखा तस्करीवर कारवाई; ७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा
लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत ७ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांव
पोलीस कारवाई


लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)।

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत ७ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २ एप्रिल रोजी मध्यरात्री चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे सापळा रचून ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मात्र, कारमधील दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सचिन विठ्ठलराव वडजे (वय २९) व अनिल नरहरी टोम्पे (वय ३०, दोघेही रा. नळेगाव, ता. चाकूर) यांचा समावेश आहे. तर शुभम मुकुंद शेलार (वय ३०) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये पांढऱ्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला, V-1 तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे व आनंद हल्लाळे यांनी केली.

दरम्यान, या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पथकाचे कौतुक करत अवैध धंद्यांविरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या गुटखा तस्करीवर कठोर कारवाई कायम राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande