
लातूर, 02 एप्रिल (हिं.स.) : महात्मा बसवेश्वर जयंतीपूर्वी गंजगोलाई परिसरातील महात्मा बसवेश्वर मंदिराची दुरवस्था दूर करून रंगकाम, डागडुजी, तसेच मंदिराच्या परिसरातील दोन्ही पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
निवेदनानुसार लातूर शहरात दरवर्षी महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा ही जयंती 19 एप्रिल रोजी साजरी होणार आहे. मात्र, शहरातील फ्रूट मार्केट भागातील महात्मा बसवेश्वर मंदिराची स्थिती अत्यंत दुरव आहे. मंदिराभोवती घाणीचे प्रमाण वाढले आहे, तसेच मंदिराच्या बाजूला अतिक्रमणे झालेली आहेत.
वीरशैव लिंगायत समाजाच्या निवेदनात महात्मा बसवेश्वर चौक व महाविद्यालयासमोर असलेल्या दोन्ही पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात यावे, अशीही मागणी केली आहे. निवेदनानुसार, ही सर्व कामे 19 एप्रिलपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
निवेदनावर बसवंतप्पा भरडे, ऍड. हामणे, कुमार पारशेट्टी, प्रा. मन्मथ पंचाक्षरी, मल्लिनाथ मेंगशेट्टे, प्रा. संगप्पा बावगे यांसह अनेक वीरशैव लिंगायत बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis