
कोल्हापूर, 02 एप्रिल (हिं.स.) । आज संपूर्ण जग युद्धजन्य परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहे, असे हवाला देत हिंदु जनजागृती समितीने श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात सामूहिक गदापूजनाचे आयोजन केले.
इतिहासातील विविध काळातील वीर मारुतीरायांच्या शक्ती आणि भक्तीची आठवण करून देताना समितीने सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या सैन्यात किंवा महाभारतात अर्जुनाच्या रथावर अधर्माविरुद्ध लढणारे हनुमान हे प्रत्येक काळात विजयाचे प्रतीक ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’साठी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीरायांच्या मंदिरांद्वारे स्वराज्याला आध्यात्मिक आणि सामर्थ्याचे बळ मिळाले, असेही समितीने अधोरेखित केले.
या उपक्रमाद्वारे देशभरातील हिंदूंमध्ये मारुतीरायांसारखे शौर्य, शक्ती आणि भक्ती जागृत करण्याचे उद्दिष्ट आहे, तसेच येणाऱ्या संकटात त्यांच्या आशीर्वादाने विजय सुनिश्चित होईल, असे सांगितले.देशभरातील ८५० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला असून, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा यासह विविध राज्यांतील हजारो युवक सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यात २०० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले. यात प्रामुख्याने समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी मनपाडळे (पन्हाळा तालुका) आणि जुने पारगाव येथील हनुमान मंदिरांचा समावेश होता.
कार्यक्रमात ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. युवकांना मारुतीरायांचे गुण आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शनही देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीने गेल्या चार वर्षांपासून देशभरात सामूहिक गदापूजन कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत असल्याचे सांगितले. यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शाहुवाडी (मलकापूर) येथील जय हनुमान कुस्ती संकुलातील युवकांसह जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar