
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.)।
- नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७मुळे सुमारे २७ हजार कोटी रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देआसरा फाउंडेशनने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासोबतच्या ज्ञान भागीदारीअंतर्गत हा अंदाज विकसित केला असून, ही आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष आणि प्रेरित खर्चाच्या माध्यमातून घडणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अंदाजानुसार, कुंभमेळ्यादरम्यान भाविकांकडून अन्न, निवास, स्थानिक वाहतूक, धार्मिक वस्तू खरेदी आदींवर होणारा प्रत्यक्ष खर्च सुमारे ८,५०० कोटी ते ११,००० कोटी रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या प्रत्यक्ष खर्चातून पुरवठा साखळी, वाहतूक, सेवा आदी क्षेत्रांमध्ये सुमारे ७,८३० कोटी रुपयांची अप्रत्यक्ष आर्थिक हालचाल निर्माण होईल. तसेच, या प्रक्रियेत उत्पन्न वाढलेल्या कामगार आणि व्यवसायिकांकडून होणाऱ्या खर्चामुळे सुमारे १०,५३० कोटी रुपयांचा प्रेरित आर्थिक परिणाम अपेक्षित आहे. या सर्व घटकांमुळे मिळून एकूण आर्थिक उलाढाल २७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.
या अभ्यासातून असेही स्पष्ट झाले आहे की, भाविकांकडून होणाऱ्या प्रत्येक १ रुपयाच्या प्रत्यक्ष खर्चातून अर्थव्यवस्थेत २ रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त आर्थिक हालचाल निर्माण होते. त्यामुळे सिंहस्थ कुंभ हा केवळ धार्मिक सोहळा नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
ही आर्थिक संधी स्थानिक व्यवसायांपर्यंत पोहोचावी यासाठी देआसरा फाउंडेशनकडून कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी सर्वसमावेशक धोरणात्मक आराखडा विकसित केला जात आहे.
या आराखड्यात धार्मिक वस्तू विक्री, अन्न सेवा, निवास व्यवस्था, मनोरंजन आणि स्थानिक वाहतूक या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रस्तावित उपक्रमांतर्गत ३० हजारांहून अधिक व्यक्तींना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, मेळा क्षेत्रात सुमारे ५ हजार विक्री जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
देआसरा फाउंडेशनने केलेले हे अंदाज नाशिक कुंभ २०१५ (३ कोटी भाविक) आणि प्रयागराज महाकुंभ २०२५ (६६ कोटी भाविक, ३ लाख कोटी रुपयांची उलाढाल) या आधीच्या अनुभवांच्या तुलनेत तयार करण्यात आले आहेत.
“सिंहस्थ हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी मोठी आर्थिक संधी आहे. या आर्थिक उलाढालीचा प्रत्यक्ष लाभ स्थानिक विक्रेते, सेवा पुरवठादार आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
देआसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले म्हणाल्या, “कुंभमेळ्यामुळे निर्माण होणारा आर्थिक परिणाम बहुपातळीवर कार्यरत असतो. प्रत्यक्ष खर्चातून अप्रत्यक्ष आणि प्रेरित आर्थिक हालचाली निर्माण होतात. सूक्ष्म उद्योजकांना या सर्व स्तरांवर सहभागी करून घेतल्यास ही आर्थिक वाढ दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक ठरू शकते.”
सिंहस्थ कुंभमेळा २०२७चा मुख्य कालावधी जुलै ते सप्टेंबर २०२७ दरम्यान असणार असून, त्यासंदर्भातील तयारी आणि संबंधित उपक्रम दीर्घ कालावधीत राबवले जाणार आहेत.
चौकट
एकूण आर्थिक उलाढाल : २७ हजार कोटी रुपये (प्रत्यक्ष + अप्रत्यक्ष + प्रेरित)
प्रत्यक्ष खर्च : सुमारे ८,५०० ते ११,००० कोटी रुपये
अप्रत्यक्ष परिणाम : सुमारे ७,८३० कोटी रुपये
प्रेरित परिणाम : सुमारे १०,५३० कोटी रुपये
आर्थिक गुणक परिणाम : १ रुपयाच्या खर्चातून २ रुपयांहून अधिक अतिरिक्त हालचाल
प्रमुख क्षेत्रे : धार्मिक विक्री, अन्न सेवा, निवास, मनोरंजन, स्थानिक वाहतूक
ज्ञान भागीदार : देआसरा फाउंडेशन
मोफत प्रशिक्षण : ३० हजारांहून अधिक लाभार्थी
तुलनात्मक आधार : नाशिक कुंभ २०१५ – ३ कोटी भाविक | प्रयागराज महाकुंभ २०२५ – ६६ कोटी भाविक
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV