केळीला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन
जळगाव, 02 एप्रिल (हिं.स.) केळीला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना चौक, न्हावी (ता. यावल) येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. या आंदोलनात सुमारे २ ते ३ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेत रस्त्यावर केळी फेकून संता
केळीला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन


जळगाव, 02 एप्रिल (हिं.स.) केळीला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना चौक, न्हावी (ता. यावल) येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. या आंदोलनात सुमारे २ ते ३ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेत रस्त्यावर केळी फेकून संताप व्यक्त केला. परिसर हा केळी उत्पादनासाठी ओळखला जात असून, येथील बहुतांश शेतकरी केळी शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केळीला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गारपीट, वादळ, रोगराई आणि वाढते उत्पादन खर्च यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कमी दरामुळे मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमधून केळी आणून थेट रस्त्यावर फेकली आणि “जय जवान जय किसान” अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. फैजपूर आणि यावल मार्गावरील बससेवाही विस्कळीत झाली असून, बसेस परत फिरवाव्या लागल्या. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान एका बाळंतपणासाठी जाणाऱ्या वाहनाला शेतकऱ्यांनी मानवतेचा दाखला देत मार्ग मोकळा करून दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी दुपारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच केळी उत्पादन, बाजारातील मागणी आणि दर याचा सखोल अभ्यास करून योग्य भाव निश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची सूचना दिली. याशिवाय, व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून, गैरप्रकार आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये बोर्डानुसार केळीला योग्य भाव मिळावा, रावेर बोर्डाच्या दरानुसार खरेदी व्हावी, व्यापाऱ्यांची मनमानी थांबवावी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने दरांवर नियंत्रण ठेवावे, अशा मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतर सुमारे दुपारी ३.४५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande