
रायगड, 02 एप्रिल (हिं.स.)।
रेवदंडा ब्रीज ते मुरूड या मार्गावर सुरू असलेल्या रस्ते कामांदरम्यान ठेकेदारांची अरेरावी आणि सुरक्षेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या निष्काळजीपणामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
सदर मार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना कोणतेही सुरक्षा फलक, सूचना फलक किंवा इशारे देण्यात आलेले नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टर, लाईट्स, बॅरिकेड्स यांचा पूर्णतः अभाव असल्याने वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. याशिवाय पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था नसून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. या खड्ड्यांजवळ कोणत्याही प्रकारचे चिन्ह, लाल झेंडे किंवा सुरक्षा उपाय नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी टाकलेल्या लोखंडी शिगा व इतर साहित्यामुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर होऊन नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नुकत्याच एका मुलीला खड्ड्यात पडून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील यांनी ठेकेदारांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची व अरेरावीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आप करे सो कायदा” अशा पद्धतीने ठेकेदार मनमानी करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्यावर उपस्थित नागरिकांनीही ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन व ट्रॅफिक यंत्रणा असतानाही अशा प्रकारे नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच अकुशल कामगारांकडून काम करून घेतले जात असून, ठेकेदार स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे “संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल का करू नये?” असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. जर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन कामाची गुणवत्ता तपासणे, सर्व आवश्यक सुरक्षा फलक व उपाययोजना अनिवार्य करणे आणि नियमांचे काटेकोर पालन होईल याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)