
अमरावती, 02 एप्रिल, (हिं.स.) - मानवी संवेदनांना हादरवणारी परिस्थिती सध्या विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन येथे निर्माण झाली आहे. कुष्ठरुग्णांसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या या सेवाभावी संस्थेवर सध्या गैस सिलिंडर टंचाईचा मोठा फटका बसला आहे. परिणामी दररोज ४५० जीवांचा जेवणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन संस्थेत सुमारे साडेचारशे रुग्ण असून, त्यांच्या दैनंदिन चहा व जेवणासाठी आवश्यक असलेला गॅस सिलिंडर मिळत नसल्याने प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य अद्याप मिळालेले नाही. परिणामी, संस्थेतील कार्यकत्यांना आणि रहिवाशांना जुन्या लाकडांचा आधार घ्यावा लागत आहे. परिसरात पडलेली व जुनी लाकडे गोळा करून ती फोडून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ या संस्थेवर आली आहे. या प्रकरणी जिलहाधिकारी यांना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नसल्याने तपोवन संस्थेच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीतही संस्थेतील 'माऊली' आणि कार्यकर्ते एकत्र येऊन भोजनाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करत आहेत. याकरिता प्राचार्य डॉ.सुभाष गवई दररोज तपोवनातील सदस्यांकरिता धावपळ करीत त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी झटत आहेत. प्रामुख्याने संस्थेतील अनेक भगिनी ज्येष्ठ असल्यामुळे त्यांच्यावर या गैस टंचाईचा भार न देता अतिरिक्त भगिनींना रोजगार देत सध्या तपोवन मधील जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही परिस्थिती केवळ एका संस्थेची नाही, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या वेदनेचे प्रतिबिब आहे. प्रश्न फक्त गॅस सिलिंडरचा नाही, तर या ४५० जणांच्या जगण्याचा आहे. आता प्रशासन आणि समाज या हाकेला कितपत प्रतिसाद देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी