
बीड, 02 एप्रिल (हिं.स.) - शिरूर कासार तालुक्यात वादळ व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. याबाबतची माहिती मिळताच तहसीलदार शिरूर कासार, महावितरण उपअभियंता तसेच संबंधित विभागांना तातडीने सूचना देण्यात आल्या असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
मौजे टेंभुर्णी येथे विद्युत प्रवाहात अडथळा निर्माण होऊन अनेक घरांमध्ये करंट उतरल्याची घटना घडली. यामध्ये एका महिलेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तसेच मौजे सावरगाव बोरगाव, तालुका शिरूर कासार येथे उन्हाळी बाजरी व चाऱ्याच्या मका पिकांचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याबाबत महसूल विभागाला निर्देश दिले .सर्व नागरिकांना विनंती आहे की, वादळी वारा व पावसामुळे कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis