
* अर्ज सादर करण्याची 5 एप्रिल अंतीम मुदत
नाशिक, 02 एप्रिल (हिं.स.) - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ’स्पंदन-2026’ राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ’स्पंदन-2026’ करीता संलग्नित महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याची अंतीम मुदत दि. 05 एप्रिल 2026 करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना आपले विविध कला-गुण सादर करण्यासाठी विद्यापीठातर्फे ’स्पंदन’ या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा या दृश्टीकोनातून वेगवेगळया तारखांना राज्यातील संलग्नित महाविद्यालयात विविध कलाप्रकार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथे ’स्पंदन-2026‘ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. युवापिढीने आपले विचार प्रकट करण्यासाठी स्पंदनाच्या माध्यमातून विद्यापीठाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या स्पर्धेत मोठया संख्येने सहभागी होऊन स्पर्धकांनी आपले मतं, भावना व विचार व्यक्त कराव्यात असे त्यांनी सांगितले.
’स्पंदन-2026‘ राज्यस्तरीय युवा महोत्सव दि. 16 एप्रिल 2026 ते दि. 05 मे 2026 दरम्यान कलाप्रकारानुसार विभागीय स्तरावर वेगवेगळया तारखांना घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत स्पर्धक साहित्य कला, संगीत, ललीत कला, नाटय व नृत्य कलाप्रकारात सादरीकरण करतील. स्पर्धकांचा सहभााग वाढावा यासाठी ही स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात येत आहे. विद्यापीठाचे www.muhs.ac.in अधिकृत संकेतस्थळावर ‘स्पंदन’ स्पर्धेची नियमावली प्रसिध्द करण्यात आली आह,े त्यानुसार संलिग्नित महाविद्यालयांनी विहित मुदतीत प्रवेशिका सादर करुन युवा महोत्सवात सहभागी व्हावे असे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले.
स्पंदन-2026 युवा महोत्सवात छत्रपती संभाजीनगर येथील फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात साहित्य कला प्रकारातील स्पर्धकांची स्पर्धा दि. 16 व 17 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार आहे. संगीत कला प्रकारातील स्पर्धा सिन्नर येथील सिंधुताई विखे पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयात दि. 20 व 21 एप्रिल 2026 रोजी तसेच पुण्यातील ढोले पाटील भौतिकोपचार महाविद्यालयात दि. 23 व 24 एप्रिल 2026 रोजी ललीत कला प्रकारातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. नाटय कला प्रकारातील स्पर्धा सोलापूर येथील साई आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय आणि संशोधन केंद्रात दि. 28 व 29 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येणार असून नृत्य प्रकारातील स्पर्धा नागपूर येथील व्ही.एस.पी.एम. यांचे भौतिकोपचार महाविद्यालयात दि. 04 व 05 मे 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
‘स्पंदन-2026’ राज्यस्तरीतय युवा महोत्सवात संलग्नित महाविद्यालयांनी सहभागी होण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थवरुन ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका सादर अनिवार्य आहे. ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्यासाठी https://automation.muhs.ac.in/ या लिंकवरुन विद्यापीठाकडे दि. 05 एप्रिल 2026 पर्यंत सादर करावी. महाविद्यालयांनी अर्ज सादर करण्याआधी ‘स्पंदन-2026’ स्पर्धेच्या नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करतांना काही तांत्रिक अडचणी असल्यास 0253-2539171 किंवा 2539173 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी