
रायगड, 02 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५–२६ या आर्थिक वर्षाअखेरीस उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवत एकूण व्यवसाय तब्बल ७१०५.३३ कोटी रुपयांवर नेला असून ८७.१५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा कमावला आहे. मागील वर्षीही बँकेने ८० कोटींपेक्षा अधिक नफा मिळविला होता, त्यामुळे सातत्यपूर्ण प्रगतीचा ठसा बँकेने उमटविला आहे.
बँकेच्या ठेवी ४०३७.१४ कोटी तर कर्जवाटप ३०६८.१९ कोटी इतके झाले आहे. तसेच बँकेच्या स्वनिधीतही वाढ होऊन तो ७७७.१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत बँकेने ३८४६.५८ कोटी रुपयांवरून ७१०५.३३ कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय वाढवत सुमारे ८५ टक्के वृद्धी साध्य केली आहे.
विशेष म्हणजे, २०२५–२६ हे वर्ष बँकेने ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ म्हणून घोषित केले होते. या उपक्रमाला शेतकरी, उद्योजक, व्यापारी, स्वयंरोजगारधारक तसेच सर्वसामान्य बचतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. स्थानिक पातळीवरील या विश्वासाच्या जोरावर बँक आता राज्याच्या पलीकडे जाऊन देशपातळीवर आपली छाप पाडत आहे. रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड यांसारख्या संस्थांकडून बँकेच्या कार्यपद्धतीची दखल घेतली जात असून, संगणकीकरणात अग्रणी ठरण्याबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना राज्य शासनाचा ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार मिळणे ही बँकेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली आहे. ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ या संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद हा बँक-ग्राहक नात्याच्या दृढतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले की, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि वेगवान सेवा या त्रिसूत्रीवर आधारित कामकाजामुळे बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. डिजिटल बँकिंग, कृषी वित्त आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रावर भर देत मार्च २०२८ पर्यंत बँकेचा व्यवसाय १०,००० कोटी रुपयांवर नेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आर्थिक प्रगतीसोबतच बँकेने ग्राहककेंद्री उपक्रमांनाही प्राधान्य दिले आहे. आकर्षक ठेव योजना, डिजिटल सेवा, तसेच पगारदार खातेदारांसाठी ५० लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या नोकरभरतीमुळे शाखास्तरावरील सेवा अधिक सक्षम झाल्या आहेत.
तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही बँकेने महत्त्वाची भूमिका बजावत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ‘लाडकी बहीण’ योजना आणि ‘पीएम किसान’ योजनेद्वारे लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक मदत पोहोचविली आहे. यामुळे बँकेची सामाजिक बांधिलकीही अधोरेखित झाली आहे.
एकूणच, सातत्यपूर्ण प्रगती, ग्राहकांचा विश्वास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांच्या बळावर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सहकार क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)