
पुणे, 02 एप्रिल (हिं.स.)। दापोडी व गवळी माथा परिसरात राबविण्यात येत असलेल्या ‘शून्य कचरा’ प्रकल्पाचा आढावा घेताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध उपक्रमांची सखोल पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
प्रकल्पस्थळी कार्यरत बचतगटातील महिलांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी आयुक्त म्हणाले की,दापोडी व गवळी माथा येथील शून्य कचरा प्रकल्प हा पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागरी स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
घरगुती कचऱ्याचे संकलन करून त्याचे ओला व सुका असे वर्गीकरण,तसेच त्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली जात आहे. या प्रक्रियेत काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असून,आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.
स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच,दापोडी व गवळी माथा येथील शून्य कचरा प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीचा आदर्श घेऊन,शहरातील इतर झोपडपट्टी भागांमध्येही अशाच प्रकारचे प्रकल्प राबविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे संपूर्ण शहरात शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा विस्तार होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या पाहणीदरम्यान उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु