
बीड, 02 एप्रिल (हिं.स.)।
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक झाल्याची माहिती आहे. मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे निधन झाले. त्यांचं पार्थिव बीड जिल्ह्यातील त्यांच्या ताडसोना या मूळगावी नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर उद्या (3 एप्रिलला) सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालमध्ये कामानिमित्त गेलेले असताना त्यांना ही माहिती मिळाल्यानंतर ते पुण्याला यायला निघाले. तुकाराम मुंढेंच्या आई आसराबाईंचे वय शंभरच्या आसपास होते अशी माहितीही मुंढे कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
प्रशासकीय सेवेतील एक कडक आणि अतिशय शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या 21 वर्षांत त्यांच्या 24 वेळा बदल्या झाल्या आहेत, या बदलीच्या प्रकरणांमुळे वेळोवेळी नागरिकांकडून प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आले आहे.
अशातच, प्रशासकीय वर्तुळात ‘सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2005 च्या तुकडीतील या आयएएस अधिकाऱ्याची, दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, तसेच महसूल आणि वन विभाग यांसारखी महत्त्वाची खाती असतील.
आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत, मुंढे यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत सातत्याने पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य दिले आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी अनेक प्रलंबित प्रकरणांवर लक्ष दिले आणि व्यवस्थेतील दीर्घकाळ चालत आलेल्या अनियमितता उघडकीस आणल्या. त्यांची कार्यशैली अनेकदा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर मानली गेली आहे. कर्मचाऱ्यांमधील गैरहजेरीला आळा घालणे असो किंवा राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी सामना करणे असो, मुंढे कोणताही संकोच न बाळगता कठोर कारवाई करण्यासाठी ओळखले जातात.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis