
छत्रपती संभाजीनगर, 20 एप्रिल (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या भूमिपूजन सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या भव्य प्रकल्पासाठी तब्बल २६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या गौतम बुद्ध यांच्या पवित्र विचारांना मूर्त रूप देणारा हा प्रकल्प समाजासाठी एक मोठा दिशादर्शक ठरणार आहे. धम्मयान एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट आणि सर्व स्वयंसेवकांनी घेतलेले परिश्रम खरोखर कौतुकास्पद आहेत.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात ध्यान आणि साधना ही काळाची गरज बनली आहे. उभारण्यात येणारे हे मेडिटेशन सेंटर म्हणजे केवळ इमारत नाही, तर एक “मन:शांतीचं विद्यापीठ” असेल. येथे ध्यान, विपश्यना, बौद्ध तत्त्वज्ञान, मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकास यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.
चार मजली अत्याधुनिक इमारत, एकावेळी ४ हजार साधक बसू शकतील अशी क्षमता, तीन विशाल ध्यान हॉल, २०० भंतेजींसाठी निवास व्यवस्था, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शन – या सर्व गोष्टींमुळे हे केंद्र जागतिक स्तरावर ओळख निर्माण करेल. थायलंड, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया, भूतान या देशांतील आचार्य साधकांना मार्गदर्शन करणार आहेत, ही विशेष बाब आहे.
दर महिन्याला होणारी विपश्यना शिबिरे, आधुनिक सुविधा, लायब्ररी, क्लासरूम्स, निवास व्यवस्था यामुळे हे केंद्र एक संपूर्ण “Spiritual Ecosystem” म्हणून उभं राहणार आहे. यामुळे केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळेल. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि छत्रपती संभाजीनगरला जागतिक ओळख मिळेल.
याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेला “इंटरनॅशनल बुद्धीस्ट फेस्टिवल फॉर सोशल अँड कल्चरल रिलेशनशिप” हा उपक्रम जागतिक शांतता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि बौद्ध पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आहे.
आजच्या कार्यक्रमाला भूतानचे गृहमंत्री ल्योनपो शेरींग, अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चाऊना मीन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis